पुणे : मकरसंक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवली जाते. हा उत्सव आता एक दिवसांवर आला आहे. धार्मिक महत्त्वाप्रमाणे पतंग उडवण्याची परंपरा देखील मकर संक्रातीला आहे. सक्रांतीच्या आठवड्यापूर्वीच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्याच ठिकाणी भव्य पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी स्पर्धा देखील घेतल्या जातात; या पतंगसाठी लागणारा मांजा हा चीनी मांजा चोरी-छुपे तयार करून विकला जातो. यामुळे अनेक अपघात होतात. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना इजा होते. तसेच लोकांना देखील यामुळे दुखापत होत असते. मकरसंक्रांत निमित्त कोणीही काच असलेला मांजा वापरू नये यासाठी गेल्या काही वर्षांपासून पेटा या संस्थेकडून शहरातील विविध रस्त्यांवर आगळ्या-वेगळ्या पद्धतीने चायनीज मांजा न वापरण्याचा संदेश देण्यात येत आहे.
पेटा संस्थेच्या स्वयंसेवकांची जनजागृती : आज पुण्यातील फर्ग्युसन रोडवर या संस्थेच्या महिला स्वतःच्या शरीरावर प्रतिकात्मक जखमा लावून रस्त्याच्या फुटपाथवर बसल्या. आजूबाजूला मांजा, पतंग ठेवून हातात फलक घेत काचेचा मांजा न वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात सहभागी तीन मुलींनी पांढरे कपडे घालून अंगावर रक्ताचे डाग लावून पक्ष्यांना होणारे त्रास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
पतंगीचा इतिहास : पतंगाचा जन्म खरा चीनमध्ये झाला. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी चीनमधील एका शेतकऱ्याने आपल्या टोपीला दोरा बांधून उडवल्याचे म्हटले जाते. तीच खरी पतंगाची सुरुवात होती. त्यानंतर कागदापासून पतंग करुन उडवले जाऊ लागले. चीनमधून पतंगाचा प्रवास भारतात झाला. चीन व कोरीयामधील प्रवाशी पतंग घेऊन भारतात आले. त्यानंतर पतंग भारतात आले आणि उडवले जाऊ लागले. पतंगासाठी चीनमधून मांजा भारतात आला का? मग त्याला चीनी मांजा का म्हणतात? हे प्रश्न विचारले जातात; परंतु चीनी मांजा नाव असले तरी तो चीनमधून येत नाही. तो आपल्याच देशात बनवला जातो. त्यावर केंद्र सरकार व एनजीटी म्हणजेच राष्ट्रीय हरित लवादाने बंदी आणली आहे. त्यानंतरही या मांजाची चोरी-छुपे निर्मिती देशात केली जाते अन् विक्रीही केली जाते.
पक्ष्यांप्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजन : संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याचा आनंद सगळेच जण घेतात. या सणाचा आनंद घेत असताना आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या काचेच्या मांजामुळे अनेक पक्ष्यांना जीव गमावावा लागतो. समाजात पक्ष्यांप्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी असे आयोजन करण्यात आले आहे.