पुणे - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यातील 14 एप्रिलपर्यंतची टाळेबंदी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. याचा फटका शैक्षणिक क्षेत्राला बसत असून अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यात पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता पुणे 'रेड झोन'मध्ये आहे. त्यामुळे टाळेबंदीची अनिश्चितता आहे. तर टाळेबंदीमुळे शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवत आहेत. पण, अनेक शाळांची अर्थव्यवस्था ढासळल्याने कर्मचाऱ्यांना पगार देण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळा चालक संघटनांकडून पालकांनी ऑनलाईन फी जमा करावी, असे आवाहन केले आहे.
पुण्यात साधारण 14 हजार खासगी शाळा आहेत. यातील 5 ते 10 टक्के शाळा सोडल्या तर अनेक बजेट शाळा आहेत. म्हणजे ज्याची फी 10 हजार ते 25 हजारांच्या दरम्यान आहे. केवळ फी हेच उत्पन्न असलेल्या या शाळांचा 80 टक्के भाग हा शिक्षक आणि कर्मचारी यांच्या पगारावर खर्च होतो. तसेच सरकारी निदान ही या शाळांना मिळत नाही. एकीकडे कोरोना संसर्गानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत शाळांनी तीन महिने फीसाठी तगादा लावू नये, असे सरकारने सांगितले आहे. मात्र, फीचे पैसे मिळाले नाही तर शाळेतील शिक्षक, सेवक यांना पगार कसा देणार, असा प्रश्न शाळा चालकांकडून उपस्थित होत आहे.
पुण्यात खासगी शाळामध्ये नोकरीला असणाऱ्या शिक्षक आणि सेवक व इतर स्टाफची संख्या साधारण 6 लाखांच्या घरात आहे. आता त्यांच्या पगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी ऑनलाईन फी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - टाळेबंदीची अनिश्चितता पाहता पुण्यात अनेक शाळा, महाविद्यालयात 'व्हर्च्युअल लर्निंग' सुरु