पुणे - राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जाहीर केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकारणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड-19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्याकडे अधिग्रहीत केल्या आहेत.
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुगणालय, पुणे यांनी आवश्यकतेनुसार अधिग्रहीत केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करुन घ्यावी, सदर नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे योग्य ते मानधन अदा करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोव्हीड -19 साथीच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्ण उपचारासाठी भरती होत आहेत. या रुग्णांना उत्कृष्ट उपचार देण्याच्या दृष्टीने व रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता कक्षामध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे नवल किशोर राम यांनी सांगितले.