बारामती - मोबाईल रिचार्ज प्रणालीप्रमाणे विजेसाठी सुद्धा प्रिपेड कार्ड पद्धत सुरू करण्याचा आम्ही विचार करत ( Prepaid Card For Electricity ) आहोत. जेवढ्या पैशाचा रिचार्ज केला जाईल तेवढीच वीज संबधितांना वापरता येईल. तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा हवी असेल तर आपल्याला नवीन तंत्रज्ञान वापरावे लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ( DCM Ajit Pawar ) आहे. ते बारामतीतील कोहाळे येथे बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, जो वीज बिल नियमीतपणे भरतो त्याला फटका बसणार नाही. जे वीज बिल भरत नाहीत त्यांचा भार वीज बिल भरणाऱ्यांवर पडतो. अलिकडे वीजेची चणचण भासायला लागली आहे. देशात व राज्यात देखील कोळशाची कमतरता आहे. त्यासाठी आम्ही परदेशातून कोळसा आयात करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतू, आपल्या पॉवर प्लांटमध्ये १०० टक्के परदेशी कोळसा चालत नाही. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वीजेची मागणी ३ ते ४ हजार मेगावॅटने वाढली आहे. बाहेरच्या राज्यांकडून देखील वीज खरेदीचा निर्णय झाला आहे.
कोयना प्रकल्पातून विजेसाठी पाणी देण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी शिल्लक ठेऊन उर्वरित पाण्याचे नियोजन विजनिर्मितीसाठी केले आहे. भर दुपारी अनेक ठिकाणी वीज सुरू असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. आता जिल्हा परिषदेकडून मिळणारे हायमस्ट दिवे आम्ही बंद केले आहेत. मात्र, हे हायमस्ट दिवे वेळेत बंद होत नाहीत. त्याचा मोठा फटका राज्याला बसत आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
'त्यांच्या' नादाला लागू नका - सध्या राज्यात व देशामध्ये काही जणांकडून धर्मा-धर्मांमध्ये जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कृपया कोणीही अशा मंडळींच्या नादाला लागू नका. त्यांच्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो सुरू आहे, त्याला कदापीही यश येता कामा नये. जातीय तणाव निर्माण झाला, तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्याचा खरा फटका गरिबाला बसतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. मोठ्या लोकांना याचा फटका बसत नाही. तो घरात बसतो. मात्र, दिवसभर काम केल्यावर ज्याच्या घरातील चुल पेटते, अशा लोकांच्यावर त्याचा परिणाम होतो, अशा शब्दांत अजित पवारांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
आजोबा म्हणायचे चल 'अजित'तमाशाला - पाऊस चांगला होणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गावगावच्या यात्रा-जत्रा सध्या सुरू आहेत. बारामतीमध्ये सुद्धा उरूस होत आहे. यानिमित्ताने कुस्त्यांचे फड पार पडत आहेत. कुस्त्यांच्या बरोबर तमाशे असतात. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी येथे तमाशा असातो का?, असा सवाल उपस्थितांना केला. ‘हो आहे’ असे उत्तर मिळताच ‘कधी तरी बोलवा तमाशाला’ असे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यावर पवार यांनी देखील ‘आजोबा म्हणायचे चल अजित तमाशाला, मात्र कधी तेंव्हा जाता आलं नाही.’ यावर ग्रामस्थांनी सहा तारखेला तमाशा आहे, असे उत्तर दिले. त्यावर ‘ठिक आहे. मी बघितला काय आणि तुम्ही बघितला काय सारखच आहे, जाऊद्या’ असे उत्तर अजित पवार यांनी दिले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : 'पवार-ठाकरेंच्या नेतृत्वात भाजपविरोधात देशातील विरोधक एकवटणार'