पुणे - श्रीमंत मराठ्यांची सत्ता असताना सुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने ते लढत नाहीत. त्यामुळे माझे आवाहन आहे की, गरीब मराठ्याने त्याचा लढा स्वतः उभा केल्याशिवाय त्याला आरक्षण मिळणार नाही, बघू या, गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांविरुद्ध लढा उभारतो का? नाही तर, त्याने आरक्षणावर पाणी सोडावे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत आपले मत मांडले आहे.
महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार एकमेकांच्या नात्या-गोत्यातील आहेत. हे सर्व जण नात्यागोत्यातच राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्याने आरक्षण मिळावे म्हणून लढा उभा केला, तो आता कोर्टात आहे. श्रीमंत मराठ्यांची सत्ता असताना सुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने ते लढत नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे आहे. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारला तरच त्यांना आरक्षण मिळेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.