पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या काही दिवसात प्रबोधनकार ठाकरे अभ्यास केंद्राची निर्मिती केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. पुण्यात प्रबोधन ठाकरे यांच्या प्रबोधन पाक्षिकाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या चौथ्या दिवशी त्यांनी उपस्थिती लावली आणि प्रबोधनकारांना अभिवादन केले, यावेळी ते बोलत होते.
हिंदुत्वाची परिणीती आजच्या तरुणांसमोर येण्याकरता हे अभ्यास केंद्र
परखडपणे मत व्यक्त करणारे प्रबोधनकार ठाकरे यांनी जातीपातीला मूठमाती दिली. अशा महान व्यक्तीचा इतिहास त्याचे विचार आणि हिंदुत्वाची परिणीती आजच्या तरुणांसमोर येण्याकरता हे अभ्यास केंद्र सुरू केले जाणार आहे. तसेच मराठी भाषा वृध्दींगत होण्याकरताही उच्च व तंत्र विभाग आणि मराठी भाषा विभाग पुणे विद्यापीठात याकरता विशेष काम करणार असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. प्रबोधन ठाकरे यांचे विचार राज्यातील तरुणांपर्यंत जावे, याकरता रत्नागिरीतही प्रबोधन ठाकरे शतकोत्तर महोत्सव लवकरच भरविणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.