पुणे - कोरोनामुळे अवघ्या देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होते. या परिस्थितीमध्ये देखील डॉक्टर्स, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून टपाल खात्यातील कर्मचारी, पोस्टमन, अधिकारी यांनी आपले कर्तव्य बजावत कोविड योद्धा असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, दुर्दैवाने टपाल खाते हे दुर्लक्षित झाल्याची नाराजी टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.
अवघ्या देशातील नागरिकांवर पाच ते सहा महिने कोरोना महामारीमुळे घरात बसण्याची वेळ आली. तेव्हा, सर्व काही ठप्प झाले होते. पिंपरी-चिंचवड शहरात दररोज हजारोच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. शहरात भीतीचे वातावरण होते. मात्र, दुसरीकडे अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात एकही सुट्टी न घेता पार्सल, कुरिअर आणि औषधी घरोघरी पोहचवण्याचे काम पिंपरी-चिंचवड शहरातील टपाल खात्याने केले आहे. यात, महिला पोस्टमनचा देखील सहभाग होता हे कौतुस्पद आहे. त्याच उत्साहाने टपाल कार्यालयातदेखील अधिकारी आणि कर्मचारी यांनी शंभर टक्के हजेरी लावत कोविडच्या काळात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.
एकीकडे बनावट कोविड योद्धाचा सुळसुळाट असताना दुसरीकडे मात्र खरे कोविड योद्धा हे दुर्लक्षित होत आहेत. भारतीय टपाल खात्याची निर्मिती होऊन कित्येक वर्षे झालीत. मात्र, आपलं रूप बदलून ते आजही अस्तित्व टिकवून आहे. जीमेल आणि व्हाट्सऍप स्पर्धेच्या जाळ्यात ते कधीच अडकून पडले नाही हे विशेष. पिंपरी-चिंचवड टपाल खात्याचे जनसंपर्क अधिकारी काळूराम पारखी म्हणतात की, लॉकडाऊनमध्ये टपाल खात्यातील सर्वच स्टाफ शंभर टक्के कामावर होता. प्रत्येक वयोगटातील कर्मचाऱ्यानी चांगल्या पद्धतीने काम केले असून सर्व सामान्य जनतेला सेवा देण्याचं काम टपाल खात्याने केले आहे. कुरिअर, मेडिसिन, रजिस्टर स्पीड हे सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहचवले आहे.
तर, पोष्टमन अशोक दुधाळे म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये काम करत असताना अनेक अडचणी आल्या. परंतु त्यावर मात करून स्वतःची पूर्ण काळजी घेऊन सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्याचे काम आम्ही केले. कोरोना असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. घरातील व्यक्ती कोरोनामुळे घाबरले होते, नोकरीवर नाही गेले तर चालणार नाही का, असे विचारत असत. आपली जी जबादारी आहे ती पार पाडली पाहिजे असे घरच्या व्यक्तींना समजावून सांगितले अस ते म्हणाले. त्याच बरोबर महिला पोस्टमन कल्पना लोहेकर म्हणाल्या आम्ही एक दिवस ही सुट्टी न घेता आमचं काम सुरू होतं. मेडिकल साहित्य, पार्सल हे सर्व नागरिकांच्या घर पोहच केलं आहे. घरी लहान मुलं सांभाळून काम करणं सोपं नव्हतं अडचणी आल्या, परंतु कर्तव्य पार पाडत गेलो.
आपण कोविड योद्धा म्हणून अनेकांना संबोधतो. पण, टपाल खात हे दुर्लक्षित असून याची खंत वाटते, आपण यांना विसरून गेलो आहोत. हे देखील कोविड योद्धा आहेत. सर्व बंद असताना डॉक्टर्स त्यांचं कर्तव्य बजावत होते. त्याप्रमाणे पोस्टमन पार्सल आणि कुरियर घेऊन येत होते. त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. त्यांचदेखील कौतुक व्हायला पाहिजे, असे टपाल खात्याविषयी आदर असलेल्या राखी सुजय धर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - पुणे-सातारा महामार्गावर धावत्या ट्रकने घेतला पेट, पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत