पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नागरिकांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले असून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस ड्रोनची मदत घेणार आहेत. अनेक नागरिक विनाकारण बाहेर पडत असून त्यांच्यावर याद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असून दोन वर्षांचा कारावास संबंधित व्यक्तीला होऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अनेक नागरिक आदेश पाळत नाहीत. अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढलेली आहे. अशा वेळी पोलीस अधिकारी हे ड्रोनची मदतीने नागरिकांवर लक्ष ठेवणार आहेत. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला कारावास होऊ शकतो. हे सर्व करण्यापेक्षा नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेच आहे.