पुणे - शासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव ठाण्याच्या पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी भाजी मंडईमध्ये एक मीटरच्या अंतरावर बॉक्स तयार केले आहेत. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांचे मत घेऊन ही शक्कल लढवली आहे. भाजी मंडईमध्ये नेहमीच गर्दी असते. मात्र, आता कोरोनामुळे सतर्क राहण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पाहिजे त्या प्रमाणात याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे तळेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन एका ठिकाणी भाजी मंडई आणि फळ विक्रेता अशी पाच दुकाने वेगवेगळी ठेवण्याचे ठरवले. त्याच्यासमोर एक मीटर अंतर ठेवत काही बॉक्स केले, जेणेकरून नागरिकांमध्ये अंतर राहील आणि कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून बचाव होईल. दरम्यान, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. तळेगावमध्ये पाच ठिकाणी हाच उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यामुळे त्याठिकाणी नागरिकांची अजिबात गर्दी होत नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.