पुणे - माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांनी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. याप्रकरणी त्यांना वानवडी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी ही नोटीस बजावली आहे.
त्यांना दिलेल्या नोटिशीमध्ये 'तुमची तक्रार लिहून घेतली असून त्यावर चौकशी करण्यात येईल, असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तरीदेखील तुम्ही आताच्या आता गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करत आहात. ही बाब शासकीय कामात अडथळा ठरते. आम्हाला कायदेशीर मार्गाने काम करू द्या अन्यथा तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल', असे म्हटले आहे.
हेही वाचा - मी बाजूला राहून चौकशी व्हावी म्हणून राजीनामा - संजय राठोड
दरम्यान, माजी मंत्री संजय राठोड अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या विरोधात पूजाचा गर्भपात करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई आणि पूजाची चुलत आजी म्हणून घेणाऱ्या शांताबाई चव्हाण यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अशाप्रकारे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.