पुणे- रिक्षामधून प्रवास करणाऱ्या शेख दाम्पत्याची 11 तोळे सोने आणि 20 हजारांची रक्कम असलेली बॅग रिक्षाचालक विठ्ठल मापारे यांनी प्रामाणिकपणा दाखवत पोलिसांकडे जमा केली होती. ही घटना बुधवारी घडली होती. पोलिसांनी प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या विठ्ठल मापारे यांचा सत्कार केला आहे.
बुधवारी मापारे यांच्या रिक्षामध्ये केशवनगर मुंढवा येथे दुपारी दीडच्या सुमारास खुद्दुस मेहबुब शेख व त्यांचे पती शहनाज शेख रिक्षात बसले. गाडीतळ बसस्टॉप याठिकाणी त्यांना सोडून मापारे यांनी त्यांची रिक्षा बी.टी. कवडे रोड पाम ग्रोव्हज रिक्षा स्टॅन्ड येथे आणून रांगेत लावली. मापारे चहा पिण्यासाठी बाहेर गेले ते चहा घेऊन परत आल्यानंतर त्यांच्या मित्रांच्या रिक्षाच्या सीटच्या मागे एक बॅग दिसली. संबंधित बॅग अगोदरच्या प्रवाशाची असावी, असा संशय आल्याने त्यांनी त्याच ठिकाणी प्रवाशाची १ ते २ तास वाट पाहिली. साडेतीनच्या सुमारास मापारे यांनी घोरपडीगाव पोलीस चौकीत जाऊन रिक्षामध्ये प्रवाशांची बॅग विसरल्याचे सांगत पोलिसांकडे दिली.
हेही वाचा-...अन्य व्यवसायासाठी परवानगी द्या, एकपडदा चित्रपटगृह मालकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
खुद्दुस महेबुब शेख यांच्या बॅग व पैसे विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. घोरपडीगाव पोलीस चौकीतून हडपसर पोलीस स्टेशनला येथे बॅग विसरल्याबाबत तक्रार आल्यास संपर्क करण्यास सांगण्यात आले. यांनंतर संबंधित महिलेला दागिने आणि पैसे असलेली बॅग परत देण्यात आली. रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलिसांनी त्याचा हार घालून सत्कार करत कौतुक केले.