पुणे - पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला सोलापूर येथे घेऊन जाणाऱ्या 2 महिलांना पुणे पोलिसांनी अवघ्या 8 तासात जेरबंद करत मुलीची सुखरूप सुटका केली. जयश्री शिवाजी कोळी (वय 26) आणि हिराबाई उर्फ बायडाबाई भानुदास खंडाळे (वय 55) असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. नवऱ्याला मृत झालेली मुलगी जीवंत दाखवण्यासाठी हे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील प्राईड आशियाना सोसायटीत फिर्यादी शिवाजी चांदमाणे राहतात. शनिवारी (16 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजता त्यांची 5 वर्षीय मुलगी अंगणात खेळत असताना अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले होते. फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी एक पथक स्थापन करून गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी अपहरण झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना अपहरण करणाऱ्या 2 महिला आरोपींची माहिती मिळाली. या महिला अपहरण केलेल्या मुलीला घेऊन सोलापूर येथे गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी सोलापूर येथे जाऊन आठ तासात या मुलीची सुटका केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत वेगळीच माहिती पुढे आली. जयश्री कोळी ही महिला मागील 4 वर्षांपासून नवऱ्यापासून दूर राहते. पुण्यातील कात्रज परिसरात ती दोन मुले आणि एका मुलीसह राहते. घरकाम करून ती उदरनिर्वाह चालवते. 6 महिन्यांपूर्वी तिच्या 5 वर्षीय मुलीचा आजाराने मृत्यू झाला होता. ही बाब तिने सोलापूर येथे राहणाऱ्या नवऱ्यापासून लपवून ठेवले होती. परंतू, अचानक नवऱ्याने मुलांना घेऊन सोलापूरला ये असे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या जयश्री कोळी हिने सोबत काम करणाऱ्या हिराबाईच्या मदतीने अपहरणाचा कट रचला आणि लोहगाव येथून मुलीचे अपहरण केले होते. तिला घेऊन ते सोलापूर येथे गेलेही होते. पण पुणे पोलिसांनी कौशल्यने तपास करीत अवघ्या 8 तासात मुलीची सुखरूप सुटका केली.