पिंपरी-चिंचवड (पुणे) - पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलिसांनी ज्वेलर्सची दुकाने फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून 1 कोटी 11 लाख 37 हजार रुपये किमतीचे 100 किलो चांदीचे दागिने, पाऊण किलो सोने, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि 5 जीवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी विकिसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय- 31 रा. हडपसर) आणि विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय- 19 रा. कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी विकिसिंग याच्यावर एकूण 56 गुन्हे दाखल असून 41 गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झालेली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर आणि परिसरातील एकूण 34 घरफोड्या पैकी दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी विकिसिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असून त्याने पिंपरी-चिंचवडसह पुण्यात आणि परिसरात गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून ज्वेलर्सची दुकाने अज्ञात व्यक्तीने फोडल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. त्याचा तपास वाकडसह गुन्हे शाखा युनिटचे पोलीस कर्मचारी अधिकारी करत होते. दरम्यान, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि सिद्धनाथ बाबर यांच्या पथकातील कर्मचाऱ्याला माहिती मिळाली की, संबंधित दुकाने विकिसिंगच्या टोळीने फोडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा शोध घेऊन हडपसर परिसरात सापळा रचून आरोपी विकिसिंगला ताब्यात घेण्यात आले, तर साथीदार विजयसिंग याला देखील पकडण्यात आले. दोघांकडे चौकशी केली असता पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 31 घरफोड्या केल्याचे उघड झाले तर इतर तीन गुन्हे पुण्यात केल्या असल्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली आहे. इतर दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्याकडून 1 कोटी 11 लाख 37 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात 100 किलो चांदीच्या दागिन्यांचा आणि पाऊण किलो सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. दरम्यान, मुख्य कुख्यात विकिसिंग हा लष्करात काम करत असल्याचे सांगून विविध ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहात असे त्यामुळे पोलिसांना तो सापडत नव्हता. अनेकदा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. अखेर त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने, सिद्धनाथ बाबर पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, जावेद पठाण, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरज सुतार, बापुसाहेब धुमाळ, बिभीषन कन्हेरकर, बाबाजान इनामदार, शाम बाबा, नितीन ढोरजे, दिपक भोसले, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.