पुणे- राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर सायबर पोलिसांची नजर राहणार असून आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाकड परिसरात पोलिसांनी रूटमार्च देखील काढला होता.
येत्या काही दिवसात राम मंदिर-बाबरी मस्जिद प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. समाज माध्यमांवर टीका-टिपणी अथवा धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून सोशल मीडियावरील वादग्रस्त हालचालींवर लक्ष ठेवल्या जात आहे.
निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावे यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. निकालाचे पडसाद शहरात उमटू नये, यासाठी शहर पोलीस विविध पातळ्यांवर सतर्क झाले आहेत. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या, तसेच सोशल मीडियावर समाजविघातक पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले आहे. तसेच भावना दुखवणारे जुने वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल करू नयेत. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हेहा वाचा- पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय