पुणे - पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. पुण्याच्या महापौर उषा ढोरे यांनी कोविड सेंटरला भेट देत तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस करत घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
रुग्णांना औषध, जेवणाची व्यवस्था आणि ऑक्सिजन पुरवठाविषयी माहिती
जम्बो कोविड सेंटरमध्ये औषध व्यवस्था कशी आहे?, जेवणाची व्यवस्था, ऑक्सिजन पुरवठा, वयोवृध्द रुग्णांना ने-आण करण्याची व्यवस्था, कर्मचारी व्यवस्थापन, रुग्ण दाखल करण्याची पद्धत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेले प्रतिक्षालय याबाबत महापौरांनी माहिती घेतली. तसेच मृतदेहाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती देणाऱ्या डॉक्टरांची हयगय केली जाणार नसल्याचा इशाही त्यांनी दिला. मृतदेह हस्तांतर करताना कुठलीही दिरंगाई होणार नाही त्याचप्रमाणे मृतदेहास टॅग लावण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे यांनी केल्या.
शहरातील कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढले
राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी जम्बो कोविड सेंटर उभारले आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागातून रुग्ण मोठ्या प्रमाणात याठिकाणी उपचारासाठी दाखल होत आहेत. परिणामी शहरातील रुग्णालयांवर अतिरिक्त भार पडत आहे. तरीही शहरातील कोरोना संसर्ग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि महापालिका प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन सत्तारुढ पक्षाचे नेते नामदेव ढाके यांनी केले आहे. तसेच उपचार सुरू असताना रुग्णांनी घाबरुन न जाता उपचार घेतल्यास निश्चितच आपण कोरोनाचा पराभव करू, असा विश्वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेने नेमून दिलेले डॉक्टर व त्याबरोबर रुग्णालय व्यवस्थापनाचे डॉ. संग्राम कपाले, डॉ. प्रिती व्हिक्टर यांनाही महापौरांनी सूचना दिल्या आहेत.