पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना धुमाकूळ घातला आहे. पोलीस आयुक्तालयालाही कोरोनाने विळखा घातला आहे. अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत एकूण 464 जणांना कोरोना झाला आहे. यातील दोन कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या 74 हजारांच्या पुढे आहे तर 60 हजाराहून अधिक नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. 464 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी, 49 अधिकारी आणि 368 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली. 45 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली आहे.