पुणे- खराडी येथील रायझिंग केअर रुग्णालयावर रहिवाशांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडरचा आवाज येत असल्याच्या कराणावरून दगडफेक करण्यात आल्याचे समजले आहे. यावेळी रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण दाखल होते. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जून महिन्यापासून रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या रुग्णालयात कोरोनाचे १६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे, या रुग्णालयात ऑक्सिजनची प्रचंड मागणी असते. त्यामुळे, दररोज दोन ते तीन वेळेस ऑक्सिजन सिलेंडर घेऊन गाडी येत असते. गाडीतून सिलेंडर बाहेर काढताना, रिकामे सिलेंडर आत टाकताना आवाज होतो. यावर रुग्णालयालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेत अनेकदा रुग्णालय प्रशासनासोबत वाद घातला होता. परंतु, काल स्थानिक नागरिकांनी टोकाची भूमिका घेत रुग्णालयावर दगडफेक केली. या प्रकारानंतर रुग्णालयाचे व्यवस्थापक उमेश शिवाजी गिरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या मजल्यावरून ड्रायव्हरच्या डोक्यावर कुंडी फेकण्याचा प्रयत्न
रुग्णालयलगत असणाऱ्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ऑक्सिजन सिलेंडर घेऊन येणाऱ्या टेम्पो चालकाच्या डोक्यावर भरलेली कुंडी फेकण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु, सुदैवाने ही कुंडी गाडीवर पडल्यामुळे अनर्थ टळला. अन्यथा ड्रायव्हरचा कपाळमोक्ष झाला असता. या घटनेनंतर 2 तास सिलिंडर बदली झाली नव्हती. त्यामुळे रुग्णांचा जीवही धोक्यात आला होता. याआधीही स्थानिक नागरिकांनी याच कारणावरून रुग्णालयाचे गेट बंद करीत सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केली होती.
दरम्यान, एकीकडे वैद्यकीय कर्मचारी कोरोना संकटाशी दोन हात करत असताना त्यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून होणारा हा प्रकार दुर्दैवी आहे. इतक्या गंभीर प्रकरणानंतरही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हेही वाचा- पुण्यातील 'या' ५ गणपतींची मंडपात होणार प्रतिष्ठापना, भाविकांना दर्शनाची नसणार मुभा