पुणे - उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. या भागात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हालाकीच्या परिस्थितीत केवळ शेतमालाचा आधार असताना पावसामुळे कांद्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
आंबेगाव तालुक्यातील नामदेव बाबुराव रोडे आणि फुलाबाई रोडे हे वृद्ध शेतकरी दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शेतात कांदा पिकवतात. मागील वर्षी त्यांना आपल्या शेतात 150 पिशवी कांदा पिकवण्यासाठी 50 हजार रुपये खर्च आला होता. पिकवलेल्या कांद्यापासून त्यांना 45 हजार रुपये मिळाले होते. गेल्या वर्षी मेहनत करूनही त्यांना पाच हजार रुपये तोटा सहन करावा लागला होता. यावर्षीही त्यांनी आपल्या शेतात दोन एकर कांदा लागवड केली. परंतु, परतीच्या पावसाने झोडपल्याने त्यांचा काढणीला आलेला कांदा शेतातच सडून गेला. केवळ पाचच पिशवी कांदा त्यांना विकता आला. आजच्या बाजारभावानुसार त्यांचे जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या
जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांचीही अशीच बिकट अवस्था आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील सरासरी कांदा लागवड (सरासरी)
खेड - 6 हजार हेक्टर
आंबेगाव - 8 हजार हेक्टर
जुन्नर - 9 हजार हेक्टर
शिरुर - 8 हजार हेक्टर