पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात आणखी एका २४ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तो फिलिपाइन्स येथून पिंपरी-चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी परतला होता. त्याला घरात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने बाधित असलेल्या व्यक्तींचा आकडा १२ वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, फिलिपाइन्स येथून प्रवास करून पिंपरी-चिंचवड शहरात २४ वर्षीय तरुण आला होता. घरात क्वारंटाईनमध्ये असल्याने त्याचा अहवाल पुण्यातील एनआयव्हीला पाठविण्यात आले असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना बाधित तरुणावर भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे महानगर पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा - कोरोनाची धास्ती; सरपंचाच्या हातात फवारणी यंत्र
शहरात दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे अनेक नागरिक शहर सोडून आपल्या गावाकडे जात आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास शहर भकास पडण्याची चिन्हे आहेत. तर, दुसरीकडे प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे.
हेही वाचा - कोरोनाचा प्रभाव: पुण्यातील मार्केटयार्ड तीन दिवस बंद