बारामती - देशात साजरे होणाऱ्या अनेक सणा पैकी दिवाळी हा सण मोठा मानला जातो. पाच दिवस साजरे होणार्या उत्सवातील पाडव्याला विशेष महत्त्व असते. देशभरातील अनेक मान्यवर कुटुंब आपपल्यापरीने दिवाळी, पाडवा साजरा करतात. मात्र बारामतीत पवार कुटुंबियांकडून साजरा केला जाणारा पाडवा अनेक अर्थाने वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असतो.
हा दिवस पवार कुटुंबीय सगेसोयरे, मित्रपरिवार, कार्यकर्ते यांच्यासाठी देतात. पवार कुटुंबियांना विशेषता पवार साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातील दिग्गज व्यक्ती मित्र, तरुण व वृद्ध येत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांना नागरिकांना भेटता आले नाही. तसेच राज्यातील कानाकोपऱ्यातील नागरिकांना पवार साहेबांना भेटता न आल्यामुळे खंत होती. सध्या दोन वर्षांच्या काळानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पवार कुटुंबीय सर्वांना भेटत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.
देशाच्या सर्वोच नेत्याला जवळून पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याबरोबरच त्यांच्यासोबत फोटो काढण्याची सुवर्णसंधीच यानिमित्ताने उपलब्ध असते. म्हणूनच मागील अनेक वर्षापासून पवार साहेबांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक बारामतीत येत असतात. त्या प्रत्येकाला पवार साहेबांना भेटण्यासाठी हा खास दिवस असतो. यादिवशी सर्वसामान्यांसह सगे सोयरे, वेगवेगळ्या पक्षातील नेते, कार्यकर्ते त्यांना भेटायला आवर्जून येत असतात. राज्यातून आलेल्या नागरिकांना सकाळी सात सात वाजल्यापासूनच पवार साहेब व कुटुंबीय भेटतात. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी रांगेत उभे असणा-या नागरिकांसाठी यावेळी ठिकठिकाणी चहा व नाष्टाची सोय असते. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला पवार प्रेमी ही भरभरुन प्रतिसाद देतात. यामुळेच या एका दिवसात हजारो कार्यकर्ते व लहान थोरांसह अबालवृध्द बारामतीत येतात. व पवार साहेबांना भेट देऊन जातात.