पुणे - पुरुषांप्रमाणेच आता महिलादेखील एसटीचे स्टेरिंग हातात घेणार आहेत. नुकतेच पुण्यात महाराष्ट्र परिवहन सेवेतील महिला चालक या पदाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
गुरुवारी पुण्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र परिवहन सेवेतील महिला चालक या पदाचा शुभारंभ करण्यात आला. याअंतर्गत आता 163 महिलांना अवजड वाहन चालविण्याचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर या महिला परिवहन महामंडळाची एसटी चालविणार आहे. सुरुवातीला महिला चालकांना तालुकास्तरावर कमी अंतराने एसटी चालवण्याची संधी दिली जाणार आहे. तर, देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग राबविला जात असून याआधी यवतमाळ येथे देखील काही महिलांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून महिलांना ही संधी देण्यात आली आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येतील आणि महिलांसाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातील. कुठलीही महिला एका डेपोवरून दुसऱ्या डेपोत गेल्यानंतर तेथील तिची सुरक्षितता फार महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे महिलांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी चालक महिलांसाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली.