पुणे - संपुर्ण देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक माणुस हा लॉकडाऊन झाला आहे. तर, कधीकाळी जंगलात मुक्त संचार करणारे जंगली प्राणी बिबट लोकवस्तीलगत मुक्त संचार करत आहेत. विशेष बाब म्हणजे लॉकडाऊन दरम्यान बिबट्याचे अपघात, मृत्यू, हल्ला अशा कोणत्याच घटनेची नोंद जुन्नर वनविभागात झाली नाही.
माणसाने जंगल परिसरात अतिक्रमण केल्याने जंगल नष्ट होत चालले आहे. त्यामुळे जंगलामध्ये मुक्तपणे फिरणारे प्राणी अन्न पाण्याच्या शोधात लोकवस्तीत आले आहे. त्यामुळे मानव आणि जंगली प्राणी यांच्यात वेगळाच संघर्ष सुरू असलेला दिसून येतो. यामध्ये बिबट व माणसाचा संघर्ष प्रामुख्याने वाढताना पाहायला मिळतो.
पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरुर परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसशेती केली जाते. या ऊसशेतीला जंगल समजुन बिबट वास्तव्य करु लागला आहे. शिकारीच्या शोधात बाहेर पडुन पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ले करु लागला. त्यामुळे शिकारीच्या शोधात फिरत असताना बिबट्याचे विहिरीत पडुन अपघात व महामार्गावरुन जात असताना वाहनांच्या धडकेतून होणाऱ्या अपघाती मृत्यूच्या घटना वारंवार घडत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात माणूस लॉकडाऊन असल्याने बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासुन बिबट्याच्या शिकार,हल्ला, अपघात अशी कुठलीच घटना समोर आली नाही.
जुन्नर विभागांतर्गत बिबट्यांची संख्या ३५० पेक्षा जास्त आहे. मागील तीन महिन्यात महामार्गावरील अपघातात २ तर विहिरीत पडुन २ अशा ४ बिबट्याच्या अपघाती मृत्यूच्या घटना समोर आल्या आहे. तसेच १९ पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र, मागील दिड महिन्यापासुन कोरोनाचा संसर्ग सुरु असताना लॉकडाऊन करण्यात आल्याने खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यातील नागरिक घरात लॉकडाऊन आहेत. तर, काही प्रमाणात शेतीची कामे सुरू आहे. मात्र, बिबट्याच्या कुठल्याच घटनेची नोंद जुन्नर विभागाकडे झालेली नाही.
बिबट्याचे वास्तव्य ऊसशेती
बिबट मानववस्तीत येऊन ऊसशेतीलाच जंगल समजुन वास्तव्य करु लागला.तसेच, शिकार म्हणुन कुत्रा,शेळ्या ,मेढ्या,व जनावरे अशा पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागला. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात बिबट्याचा व माणसांचा संघर्ष दिसुन येत नाही, तर बिबट्याचा मुक्तपणे संचार पहायला मिळत आहे.
वनविभागाने तयार केलेली वनमित्रांची रेस्क्यूटीम पोलिसांच्या मदतीला
जुन्नर विभागांतर्गत खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी २१ वनमित्रांची रेस्क्यूटीम तयार करण्यात आली आहे. या रेस्क्यूटिमच्या माध्यमातून बिबट आणि इतर जंगली प्राण्याच्या मदतीला ही टिम नेहमीच सज्ज असते. मात्र, सध्या कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात वन्यप्राण्यांची कुठलीच घटना घडत नसल्याने ही २१ वनमित्रांची रेस्क्यू टिम पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन लढत आहेत.
वन्यप्राण्यांना कोरोनाचा धोका?
शिकार व अन्नपाण्याच्या शोधात लोकवस्तीत वास्तव्य कराणारा बिबट व अन्य वन्यप्राणी मुक्तपणे सर्वत्र संचार करत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी माणुस घरात लॉकडाऊन आहे. तर, वन्यप्राणी मुक्तपणे संचार करत आहे. त्यामुळे या प्राण्यांना कोरोनाचा धोका नाही का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.