पुणे - अनेक तालुक्यांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. या चक्रीवादळामुळे खेड आणि हवेली तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. हवेली तालुक्यातील मोकरवाडी येथील प्रकाश किशन मोकर (वय 52) आणि खेड तालुक्यातील वहागाव येथील मंजाबाई अनंत नवले (65) या दोघांचा मृत्यू झाला. तर वहागाव येथील तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याशिवाय, जुन्नर, खेड, मुळशी, वेल्हा, भोर, मावळ, आंबेगाव, पुरंदर, दौंड या तालुक्यातील घरांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
वादळामुळे घरावरील उडून जाणारा पत्रा पकडण्याचा प्रयत्न करत असताना प्रकाश मोकर हे वाऱ्यासह वर उडाले होते. त्यानंतर खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर घराची भिंत कोसळल्याने मंजाबाई नवले यांचा मृत्यू झाला. निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार जुन्नर, खेड, मुळशी, वेल्हा या तालुक्यातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
या चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान मुळशी तालुक्यात झाले आहे. मुळशी तालुक्यातील 70 हुन अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर 30 हुन अधिक झोपड्या उद्धवस्त झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील 100 हुन अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर विजेचा धक्का लागल्यामुळे तीन जनावरांचाही मृत्यू झाला. वेल्हा तालुक्यातील तीन शाळा आणि एका ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची पत्रे उडून गेली आहेत.