पुणे - कोरेगाव भीमाची लढाई ( Koregaon Bhima Dispute ) ही पेशव्यांच्या विरोधात होती. मात्र 1 जानेवारी 1818 रोजी कोरोगाव भीमा येथे झालेली लढाई नसून फक्त एक चकमक होती. तेव्हा ब्रिटिशांनी फक्त संरक्षण केले आणि तसा उल्लेखही स्तंभावर आहे, असे मत '1 जानेवारी 1818 कोरोगाव भीमा लढाईचे वास्तव' या पुस्तकाचे लेखक अॅड. रोहन जमादार माळवदकर यांनी मांडले आहे. इतिहासाच्या अशा उल्लेखामुळे या पुस्तकावरून नवा वाद निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. '1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव' या पुस्तकाच्या लेखकाशी ईटीव्ही भारतने बातचीत केली आहे.
समकालीन संदर्भ आणि पुराव्यांसह कोरेगाव भीमा लढाईची सत्य माहिती देणारे हे पुस्तक असल्याचं माळवदकर यांचं म्हणणं आहे. जाती-अंताच्या नावाखाली समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीने कोरेगावच्या लढाईचा खोटा इतिहास मांडला जात आहे. या लढाईत शौर्य गाजविणारे खंडोजीबीने गजोजी माळवदकर यांना इंग्रजांनी जयस्तंभाचे प्रमुख म्हणून नेमले होते. त्यांचा वंशज या नात्याने खरा इतिहास समोर यावा, सामाजिक सलोखा कायम राहावा या उद्देशाने संदर्भ पुराव्यांच्या आधारे दोन शतकांपूर्वी झालेल्या कोरेगाव भीमाच्या लढाईचे वास्तव सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तिकेच्या माध्यमातून केला आहे, असा दावा रोहन माळवदकर यांनी केला. मात्र आता या पुस्तकावरून पुन्हा वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.