पुणे - उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, निंदनीय आहे. महाराष्ट्रात काही घडलं की राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी विरोधक करतात. परंतु, उत्तर प्रदेश येथील घटनेवर कोणी बोलायला तयार नाही. देशात सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला अटकाव केला जातो. हे सर्व पाहता ही अघोषित हुकूमशाही आहे का? असा प्रश्न पडतो, असे म्हणत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. ते पिंपरीत राष्ट्रवादी पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह इतर पदाधिकारी होते.
हेही वाचा - सिरम इन्स्टिट्यूट भेटीचे शरद पवारांनी सांगितले 'हे' कारण
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात काही घडलं की लगेच विरोधक राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करतात. उत्तर प्रदेश येथील हाथरसमध्ये निंदनीय आणि दुर्दैवी प्रकार घडला त्या विषयी कोणी बोलताना दिसत नाही. असे असताना देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी हे पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जातात. तेव्हा, ज्या पद्धतीने अटकाव केला जातो हे सर्व पाहता ही दडपशाही नाही का? गळचेपी नाही का? विरोधातील आवाज ऐकायचाच नाही अशी मानसिकता नाही का? की, अघोषित हुकूमशाही आहे? असे अनेक प्रश्न प्रत्येकांना पडत आहे, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, पार्थ पवार यांनी केलेलं ट्विट हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने सातत्याने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.