पुणे - राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद मिळाले तर मातोश्रीवर सीसीटीव्ही लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. 'कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत, चोराच्या मनात चांदणे' अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. त्यांचा 25 वर्ष जुना सहकारी त्यांना सोडून गेल्याने पाटील यांना मोठे दुःख झाले आहे, हा सल त्यांच्या मनात आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, दिलीप वळसे, रुपाली चाकणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - चंद्रपुरातील आदिवासी माना जमातीचा नागदिवाळी उत्सव, 'असा' करतात साजरा
पवार पुढे म्हणाले, येत्या 30 तारखेला मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाईल. या मंत्रीमंडळामध्ये कोण-कोण सहभागी होणार, हे ज्या त्या पक्षाचे नेते ठरवतील. मात्र, आमच्या पक्षाकडे अजून एक चांगले खाते मिळणार आहे, असे ते म्हणाले. तर गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे येणार का, याबाबत त्यांनी कुठलीही स्पष्टता केली नाही. तसेच पुढील काळात राज्यात काही ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार का, यावर बोलताना, स्थानिक पातळीवर यावर काही तोडगा निघतो ते बघितले जाईल, नाही तर वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल. सध्या त्या दिशेने चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.