पुणे Qureshi Community Decision : अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जात आहे. या उत्सवात फक्त हिंदू नव्हे तर मुस्लिम समाज तसेच विविध धर्मियांकडून देखील सहभाग घेतला जात आहे. विविध समाजाकडून राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
कुरेशी समाज करणार मिठाईचे वाटप : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुणे शहर कुरेशी समाजाकडून मटण आणि चिकन विक्री दुकाने आणि सर्व व्यवहार बंद करून, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप केले जाणार आहे. कुरेशी समाज श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या या उत्सवात सहभागी होणार असल्याचं ऑल इंडिया कुरेशी जमियतुल कुरेश एक्शन कमिटीने जाहीर केलं आहे.
कुरेशी समाजाचा मोठा निर्णय: आज कुरेशी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी सर्वानुमते हा निर्णय झाला आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचा उत्साहाने होत असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद कुरेशी समाजास होत आहे. श्रीराम हे सर्व धर्मासाठी अत्यंत पुजनीय आहेत. अयोध्येमधील त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात आहे. यासाठी ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीच्या वतीनं २२ जानेवारीला कुरेशी समाज आपले सर्व व्यवहार बंद करून या कार्यक्रमात आनंद आणि उत्साहाने सहभागी होत आहेत, असं यावेळी अध्यक्ष सादिक कुरेशी यांनी सांगितलं.
देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार: 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होणार असल्यानं देश-विदेशातून भाविक अयोध्येत दाखल होणार आहेत. याशिवाय देशातील प्रत्येक शहरात, तालुका आणि गाव पातळीवर राम मंदिर लोकार्पणाचा भव्य उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्तानं देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून या दिवशी अयोध्येत 1 ट्रिलियन रुपयांची अर्थात १ लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज उत्तर प्रदेश सरकारने वर्तवला आहे. मात्र हे फेक असल्याचं अर्थतज्ञांनी म्हटलंय.
उलाढाल कशा प्रकारे होणार? : २२ जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त उत्तर प्रदेश आणि अयोध्यामध्ये तब्बल १ ट्रिलियन रुपयांची उलाढाल होणार आहे, अशी माहिती ट्रेडर्स संघटनेनी दिली आहे. श्रीराम मंदिर आणि प्रभू राम यांच्याची संबंधित कित्येक वस्तू बाजारात आल्या आहेत. प्रभू श्रीराम असलेले पुतळे, झेंडे, शर्ट, कुर्ता, फोटो फ्रेम, बॅनर, टोप्या, अंगठ्या, अयोध्यातील राम मंदिराची प्रतिकृती असलेली लहान-लहान मंदिरं आदींच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, यांची प्रचंड विक्री होत आहे. तसंच उत्तर प्रदेश आणि अयोध्यामध्ये देश-विदेशातील रामभक्त दाखल होत असल्यामुळं टूर ट्रॅव्हल्स, हॉटेल आणि लॉज यांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी २२ जानेवारी रोजी अयोध्यात १ ट्रिलियन रुपयांची अर्थात १ लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती ट्रेडर्स संघटनेनी दिली आहे. तसंच प्रभू रामावरील भक्ती आणि श्रद्धा यामुळं कित्येक नागरिकांनी नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. यामुळंसुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये भर पडत असून, २२ जानेवारी रोजी मोठी उलाढाल होणार असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा: