पुणे : मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील कुचवाडा गावात आचार्य रजनीश ओशो यांचा 11 डिसेंबर 1931 रोजी झाला होता. 21 मार्च 1953 रोजी जबलपूर येथे वयाच्या 21 व्या वर्षी मौलश्री वृक्षाखाली त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ ओशो संबोधी दिवस साजरा केला जात असतो. आचार्य रजनीश ओशो यांच्या शिष्यांनी संगीत साधना करत आज पुण्यात ओशो संबोधी दिन साजरा केला आहे. पुण्यातील अल्पबचत भवन येथे जगभरातून दोन ते अडीच हजार ओशो शिष्य दाखल झाले आहेत. या शिष्यांच्या माध्यमातून संगीत सत्संग व ध्यानधारणा करून हा दिवस साजरा करण्यात आला आहे.
ओशो संबोधी दिवस साजरा : ओशो संबोधी दिवसानिमित्त रजनीश ओशो यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून ओशो शिष्य पुण्यात आलेले आहेत. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना माळा घालून आश्रमात प्रवेश नाकारल्यामुळे तसेच ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरमध्ये ओशो जयंती, ओशो पुण्यतिथी गुरुपौर्णिमा ओशो संबोधी दिवस असे कुठल्याही प्रकारचे उत्सव साजरे केले जात नाहीत. त्यामुळे ओशोंच्या शिष्यांनी एकत्र येऊन पुण्यातील अल्पबचत भवन येथे संबोधी दिवस साजरा केला आहे.
आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन : यावेळी बोलताना स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले की, ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना ओशोप्रेमींना गळ्यामध्ये माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. उद्या मंगळवारी ओशनची माळा घालून आश्रमात प्रवेश करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अतिशय शांततापूर्ण मार्गाने आम्ही आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करत आहोत.
ओशो भक्तांची मागणी : पोलिसांकडून व स्थानिक प्रशासनाकडून कोरेगाव पार्क येथील ओशा आश्रम परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तरीही ओशो शिष्य शांततापूर्ण मार्गाने आश्रमात जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. ओशोंची माळा हा आमचा अधिकार आहे आणि ओशो माळा घालूनच आम्हाला आश्रमात प्रवेश दिला जावा. समाधीचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
संबोधी म्हणजे काय : संबोधी म्हणजे आत्मज्ञान होय. आत्मज्ञान ही अविचारी स्थिती आहे. याला योगातील सांप्रज्ञा समाधीचा पहिला स्तर म्हणतात. या स्थितीत व्यक्तीचे मन स्थिर राहते. त्याचा शरीराशी संबंध तुटत असतो. तरीही तो त्याच्या इच्छेनुसार शरीरात राहतो. ही कैवल्य, मोक्ष किंवा निर्वाणापूर्वीची अवस्था मानली जाते. हे सतत श्वासाकडे लक्ष देऊन किंवा साक्षी वृत्तीने होत असते. 21 मार्च 1953 रोजी जबलपूर येथे वयाच्या 21 व्या वर्षी मौलश्री वृक्षाखाली त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते.