पुणे - चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपनीला पाण्याचा टँकर न पुरवल्याने एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १४ मे) रोजी सायंकाळी (महाळुंगे, ता.खेड) येथील रेणुका हॉटेल समोर घडली. अतुल तानाजी भोसले (वय २६, रा. भोसले वस्ती, महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हल्ला करणारी टोळी फरार झाली आहे.
हल्ला झालेला हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर चाकण येथील खासगी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी चिंचवड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना (दि. १५ मे) रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. अतुल भोसले याची कंपनिशी संबंधित असलेल्या अक्षय शिवळे याच्यासोबत कंपनीला पाण्याचे टँकर पुरवण्यावरून फोनवर बाचाबाची झाली होती. त्यानंतर अतुलवर हल्ला केला अशी माहिती अतुलचा मित्र अक्षय पंडित बोऱ्हाडे (वय २६, रा. महाळुंगे ) याने महाळुंगे पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी अक्षय अशोक शिवळे, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव (सर्व रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) व तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश आढारी हे करत आहेत.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्येही डान्स बार सुरू, पालिकेचा बुलडोझर