पुणे : 'राज्यातील सहकार खात्यात भ्रष्टाचार सुरू आहे. याची माहिती मला सरकारला द्यायची आहे, पण त्यांच्याकडे वेळ नाहीये. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोणत्या नशेत फिरत आहे मला माहित नाही. हे सरकार भांग मारत आहे की अजून काय मारत आहे ते मला माहीत नाही', अशी जळजळीत टीका शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत आज दौंडमधील भीमा पाटस कारखान्याला भेट देणार होते, मात्र तेथे जात असताना पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले.
'सरकार कोणत्या नशेत फिरत आहे हे माहीत नाही' : भीमा पाटस कारखान्याच्या घोटाळ्याबाबत कारखान्याचे संचालक आमदार राहुल कुल यांनी, मी विधानसभेत उत्तर दिलं आहे, असे आज म्हटले. यावर राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, 'यावर जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही म्हणजे काय? आज देशात तसेच राज्यात विरोध पक्षातील अनेक नेते किरकोळ कारणाने तुरुंगात आहे. काही जण या आधी गेले आहेत. आज प्रत्येक विरोधी पक्षातील आमदारावर काही ना काही कारणाने कारवाई केली जात आहे. मी दोन प्रकरणे बाहेर काढली. एक दादा भुसे, जे आज या सरकार मध्ये मंत्री आहे. त्यांनी शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांचे पैसे गोळा केले. अधिकृत आकडा हा 100 कोटी रुपयांचा आहे. ते हे मान्य करत नाही. याचं उत्तर कोण देणार आहे. याच्या चौकशीची मागणी आम्ही केली असता आम्हाला नशेत असल्याचं सांगितलं गेलं. तसेच दौंड बाबत ऑडिट रिपोर्ट दिला आहे. आमदार राहुल कुल यांच्यावर आरोप आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहेत. मात्र त्यांना वेळ नाहीये. सरकार कोणत्या नशेत फिरत आहे हे मला माहीत नाही, अशी टीका यावेळी राऊत यांनी केली.
'शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नाही' : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला असल्याची चर्चा सुरू आहे. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हे साफ खोट आहे. मी स्वत: तिथे उपस्थित होतो. अश्या पद्धतीने कोणी जर खोटी माहिती प्रसिद्ध करत असेल तर तो गुन्हा असून यावर अद्यापही चर्चा झालेली नाही. लोकशाहीत मुख्यमंत्री पदाची इच्छा कोणालाही होऊ शकते. 145 चे संख्याबळ जो उभा करेल तो या राज्याचा मुख्यमंत्री होईल, असे यावेळी राऊत म्हणाले.
हेही वाचा : MLA Ajay Chaudhary Warrant : उद्धव गटाचे आमदार अजय चौधरी यांच्याविरोधातील वॉरंट रद्द