पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात चार वर्षीय चिमुकलीचा तिच्याच मातेने खून केल्याची हृदयद्रावक घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्या महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.
रिया काकडे (वय 4 वर्षे), असे खून करण्यात आलेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या सांगवी परिसरातील घरात आईसह सहा महिन्यांच्या मुलगा आणि रिया होती, तर घरातील इतर सदस्य हे नातेवाईकाचा दशक्रिया विधी असल्याने बाहेरगावी गेले होते. आज रिया त्रास देत असल्याने सविता हिने रियाला रागाच्या भरात भिंतीवर आदळले यात तिचा मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेनंतर तातडीने संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.