पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रस्तावित मेट्रो मार्गावर सुमारे ६८५ झाडे तोडण्यात येणार होती. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा ३ हजारापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनातर्फे आत्तापर्यंत पुनर्रोपणाच्या माध्यमातुन १,१५० झाडे लावण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी वृक्षतोडीच्या संदर्भात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला होता. चव्हाण यांनी त्यांच्या निवेदनामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी यापूर्वी तोडलेल्या आणि तोडण्यात येणाऱ्या वृक्षांची संख्या, तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या मोबदल्यात आत्तापर्यंत किती वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले, आदी प्रश्न उपस्थित केले होते.
आत्तापर्यंत मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात आलेल्या १,१५० झाडांचे कोथरूड येथील एआरएआयच्या टेकडीवर पुनर्रोपण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. मेट्रोने वृक्षांच्या पुनर्रोपणा संदर्भात आकडेवारी जाहीर केल्यामुळे हा वाद मिटण्याची शक्यता आहे.