पुणे - कोरोना संकटामध्ये आर्थिक कंबरडे मोडले असताना सामान्य नागरिकांना मात्र वीज बिलाने शॉक दिला आहे. महावितरण'कडून कुठलाही प्रकारचे रीडिंग न घेता अक्षरशः डोळे पांढरे करणारे बिल सामान्य ग्राहकांना दिली जात आहेत. पुण्यातील वारजे भागात राहणारे राजेंद्र मासुळे कुटुंब यांना सप्टेंबर महिन्यात तब्बल 47 हजारांहून अधिक बिल आल्याने त्यांना धक्काच बसला आहे.
जागा खरेदी विक्री करणाऱ्या राजेंद्र याचे काम लॉकडाऊनमुळे पूर्णपणे ठप्प झाले आहे. मात्र, लाईटबिलाने त्यांना पुरते हैराण केले. गेल्या पंधरा वर्षांपासून छोट्याशा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मासुळे महिन्याला साधारण एक हजार बिल येत होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात तब्बल 47 हजारांहून अधिक बिल आले आणि त्यांना धक्काच बसला आहे. वन बीएचके फ्लॅट असलेल्या मासुळे कुटूंबात पाच जण राहतात. घरात तीन ट्युबलाइट, फ्रीज, टीव्ही इतकीच उपकरणे असताना महिन्याला 1 हजार बिल येत होते. मात्र, गेल्या अनेक महिन्यापासून महावितरणकडून कुणीच रीडिंग घेण्यास न आल्याने थेट 47 हजारांचे बिल छापून घरी पाठवण्यात आले.
मासुळे कुटुंबीयांनी हे बिल भरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भविष्यात यापेक्षा ही जास्त बील येण्याची त्यांना भीती आहे. त्यामुळे थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीच आम्हाला न्याय द्यावा, अशी विनवणी त्यांनी केली आहे.
काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात चाल - संगीता तिवारी
शहरात काँग्रेस पक्षाकडून वाढीव लाईट बिलाबाबत नागरिकांच्या तक्रारीसाठी संपर्क करण्यासाठी आणि नागरिकांच्या मदतीसाठी कक्ष सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत 2 हजार 500हून अधिक लोकांनी वाढीव बिलाबाबत येथे संपर्क केला आहे. आमच्याकडे आलेल्या तक्रारीत सर्वाधिक 98 हजार रुपयेच लाईटबील आले आहे. वाढीव बिलाबाबत महावितरणाकडे अनेक निवदने देऊनही नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण झालेले नाही. काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात चाल चालतेय की काय? हा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव संगीता तिवारी यांनी व्यक्त केले आहे.