पुणे - राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी (Shivjayanti Celebration) करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले होते. त्यानुसार आज मनसेकडून राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे स्वत: आज शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व महाअभिषेक देखील घातला. सकाळपासूनच गड हा ढोल-ताशा आणि शिवगर्जनांनी दुमदुमन गेल्याचे पाहायला मिळाले.
अमित ठाकरे यांच्याहस्ते गडावरील शिवाई देवीची पूजा -
राज्यभरातून शिवप्रेमीही सकाळपासून गडावर दाखल झाले होते. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाकडून गडावर पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला. सकाळीच अमित ठाकरे यांच्याहस्ते गडावरील शिवाई देवीची पूजा करण्यात आली. यावेळी शेकडो मनसैनिक आणि शिवप्रेमी गडावर हजर होते.
फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलो -
यावेळी मनसेच्या युवा सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे आणि इस्त्राईलचे राजदूत कोब्बी शोषिर हे देखील उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे यांनी शिवाई देवीचा अभिषेक केला व पाळण्याची दोरी ओढून शिवजन्मसोहळ्यात सहभाग घेतला. आपण 2 वर्षांपूर्वी राजकारणात आलो तेव्हापासून किल्ले शिवनेरीवरील सोहळ्यात उपस्थित राहण्याची इच्छा होती, म्हणून आज आलो आहे. फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.