पुणे - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजप महिला मोर्चातर्फे सोमवारपासून (दि.18 जाने.) राज्यभरातील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार पारिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
पवारांनी राज्यातील जनतेचे भ्रमनिरास केले
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरत होती. मात्र, शरद पवार यांनी मुंडे यांच्याबाबत पोलीस चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल त्यानंतर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले. हे एक प्रकारे धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. शरद पवारांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीस चुकीच्या गोष्टीवरून आजपर्यंत कोणालाही पाठीशी घातलेले नाही. त्यांनी अशा घटनांच्या वेळी कठोर भूमिका स्वीकारलेली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्याबाबत झालेल्या बैठकीत पवार यांनी राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे, अशी टीका यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.
नैतिकतेच्या आधारे मुंडेंनी राजीनामा द्यावा
धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत काही वर्षापासून संबंध होते व दोन मुले आहेत. त्यांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांना माझे नावे देखील दिली आहे. यासर्व गोष्टी मुंडेंनी मान्य केले आहेत. धनंजय मुंडेंनी स्वतः कबुली दिल्यावरही राष्ट्रवादी काँग्रेस कारवाई का करत नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. याच मुद्द्यावर आमचा आक्षेप असून मुंडेंनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, अशी आग्रही भूमिका असल्याचे पाटील म्हणाले.
हेही वाचा - पिंपरीत लसीकरण सुरू असताना मनसे नेत्याचा लसीकरण केंद्रातच वाढदिवस साजरा