पुणे : पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना सध्या कोरोनासोबतच आणखी एका समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या आहे, भटक्या कुत्र्यांची. हिंजवडी फेज-थ्री परिसरातील सांगरिया या सोसायटीमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवल्याची घटना घडली. या मुलीच्या हाता-पायाला कुत्र्यांनी चावा घेतला असून, या घटनेत ती गंभीररीत्या जखमी झाली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. गंभीर बाब म्हणजे, सोसायटीमधील तब्बल ३८ पेक्षा अधिक लोकांचा या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या पार्किंग लॉटमधून एकटी जात असताना अचानक कुत्र्यांनी या मुलीवर हल्ला चढवला. कुत्री धावत येत असल्याचे पाहून ती ओरडत पळायला लागली. तेव्हा एका कुत्र्याने तिच्या पायाला चावा घेत तिला खाली पाडले. त्यानंतर आणखी तीन कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत अक्षरशः तिच्या अंगाचे लचके तोडले. त्यानंतर ती कुत्री चक्क तिला फरपटत घेऊन जायच्या प्रयत्नात होती; तेव्हा सुदैवाने सुरक्षा रक्षकाने काठी आपटत आरडाओरडा करुन कुत्र्यांना पळवून लावले, आणि पुढील मोठा अनर्थ टळला.
या मुलीला 15 ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी धारक हिमेश सागर यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे सोसायटी परिसरात भीतीचे वातावरण असून, लहान मुले आणि जेष्ठ नागरीक भीतीच्या सावटाखाली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोसायटीमधील 38 पेक्षा अधिक नागरिकांना या मोकट कुत्र्यांनी चावा घेतला असल्याचे सोसायटीमधील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे याचा लवकरच बंदोबस्त करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा गंभीर घटनेत एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.