मुंबई - म्हाडा प्राधिकरणाच्या पुणे मंडळांच्या विविध गृहनिर्माण योजनेच्या प्रक्रियेचा शनिवारी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. एकूण ४ हजार ७५६ सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे या प्रक्रियांना यावेळी प्रारंभ करण्यात आला.
पुणे मंडळातर्फे सोडतीकरीता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत सोमवार 3 मार्चपासून सकाळी दहा वाजता अल्प बचत भवन, ७ क्वीन्स गार्डन, कौन्सिल हॉल मागे, कॅम्प, येथे काढण्यात येणार आहे. मंडळांतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या संगणकीय सोडतींकरीता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अशी असेल प्रक्रिया-
या सोडतीकरीता अर्जदारांची नोंदणी दि. ०२ मार्च, २०१९ सकाळी १२ वाजेपासून दि. १२ एप्रिलला सायंकाळी ५ वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दि. ०३ मार्च सकाळी १० वाजेपासून दि. १२ एप्रिल रोजी रात्री ११. वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. याच कालावधीत नोंदणीकृत अर्जदारांना अनामत रक्कम भरता येणार आहे.
या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे (पुणे), सांगली, म्हाळुंगे (पुणे), करमाळा (जि. सोलापूर) येथील अत्यल्प गटातील १ हजार ६६२ सदनिकांचा समावेश आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत म्हाळुंगे (पुणे), बालाजी पार्क (कोल्हापूर) येथे ३०५ सदनिका अत्यल्प गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अल्प उत्पन्न गटाकरीता म्हाळुंगे इंगळे (पुणे), शिवाजीनगर सोलापूर, बालाजी पार्क (कोल्हापूर), दिवे (ता. पुरंदर), सांगली येथील ६१२ सदनिकांचा समावेश आहे.
मध्यम उत्पन्न गटाकरीता म्हाळुंगे इंगळे (पुणे), शिवाजी नगर सोलापूर, जुळे सोलापूर, दिवे (ता. पुरंदर) सासवड (ता. पुरंदर), सांगली, पिंपरी वाघिरे येथील ९७३ सदनिकांचा समावेश आहे. उच्च उत्पन्न गटाकरीता जुळे सोलापूर, पिंपरी वाघिरे (पुणे) येथील ३४६ सदनिकांचा समावेश आहे.
अशी असेल मर्यादा आणि मुदत-
२० टक्के अंतर्गत सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर पालिका हद्दीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी २०६ सदनिका आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीत ६३९ सदनिकांचा समावेश आहे. सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांनीं कागदपत्रे सादर करण्यासाठी दि. ४ मे रोजी सकाळी १० वाजेपासून दि. ३१ मे रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अत्यल्प उत्पन्न गटाकरिता कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा रू. २५,००० पर्यंत आवश्यक आहे. अल्प उत्पन्न गटाकरीता रू. २५,००१ ते रू. ५०,०००, मध्यम उत्पन्न गटाकरीता रू. ५०,००१ ते रू. ७५,००० पर्यंत आहे. उच्च उत्पन्न गटाकरीता रू. ७५,००१ व त्यापेक्षा जास्त कौटुंबिक मासिक उत्पन्न असणे गरजेचे आहे.
सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुणे मंडळाचे माननीय सभापती समरजितसिंह घाटगे, मुख्य अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.