पुणे Mayank Chaphekar Special Story : राज्यातील ठाणे येथे राहणाऱ्या 23 वर्षीय मयंक चाफेकर हा गेल्या 18 वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये असून तो वयाच्या 5 वर्षापासून स्विमिंग करत आहे. लहानपणापासूनच पाण्याची आवड असल्यानं आई वडिलांनी त्याला स्विमिंग करायला लावलं आणि हळूहळू त्यात त्यालाही आवड निर्माण झाली. तेच त्याचं करिअर बनत गेलं. 2018 मध्ये तो मॉडर्न पेंटॅथलॉनच्या या गेम मध्ये आला, अशी माहिती यावेळी मयंकनं दिली. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये पाच स्पर्धा असतात त्यात तलवारबाजी, पोहणे, घोडेस्वारी, पिस्तुल नेमबाजी आणि धावणे यांचा समावेश होतो. यासाठी मयंक हा कायरो इजिप्तमध्ये तयारी करतो.
आई वडिलांचं स्वप्न : आई वडिलांचं स्वप्न होतं की आपल्या मुलानं देशासाठी राज्यासाठी काहीतरी करावं आणि जेव्हा माझी आवड त्यांनी बघितली तेव्हा माझ्या आई वडिलांनीच माझ्या या करिअरसाठी खूप मेहनत घेतली. लहानपणापासून स्विमिंग ते आत्ता मॉडर्न पेंटॅथलॉनपर्यंत त्यांनीच माझ्यासाठी सर्वकाही केलं आहे. मॉडर्न पेंटॅथलॉनसाठी भारतात कुठेही सुविधा नसल्यानं याच्या तयारीसाठी विदेशात जावं लागतं. एकवेळ अशी होती की, याच्या तयारीसाठी पैसे नसल्यानं आईनं तिचं सोनं तर वडिलांनी गाडी विकली आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलासाठी वडील वैभव चाफेकर यांनी तर त्यांची नोकरी सोडून मयंकला कोचिंग करायला सुरवात केली आणि ते मुख्य कोच म्हणून आपली भूमिका बजावत आहेत.
मॉडर्न पेंटॅथलॉनबाबत माहितीच नव्हती : मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारा आणि नॅशनलसह विविध ठिकाणी मेडल्स मिळवणाऱ्या मयंकला मॉडर्न पेंटॅथलॉनबाबत काहीच माहिती नव्हती. तो स्विमिंगमध्येच आपलं करिअर करत होता. पण 2018 साली या मॉडर्न पेंटॅथलॉनच्या सब गेम्सबाबत माहिती मिळाली आणि याची माहिती घेत यामधील गेम्सच्या तयारीसाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी गेला. मग 2022 साली इजिप्त मध्ये कैरो इंटरनॅशनल स्टेडियममध्ये मॉडर्न पेंटॅथलॉनची तयारी सुरू केली.
स्वप्नाच्या जवळच होतो आणि दुखापत झाली : नुकत्याच झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत विविध खेळात अनेक खेळाडूंनी विविध पदके पटकावली. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये भारतातून निवड झालेला मयंक हा एकमेव खेळाडू होता. याबाबत तो सांगतो की ऑलंपिंकसाठी क्वालिफिकेशन राऊंड असल्यानं आणि भारतातून मॉडर्न पेंटॅथलॉनसाठी निवड झाल्यानं मी एशियन गेम्स खेळायला गेलो. सेमी फायनलमध्ये असताना म्हणजे स्वप्नाच्या एकदम जवळच असताना तलवारबाजीमध्ये दुखापत झाली आणि माझं स्वप्न भंगलं. या गोष्टीला जरी दीड महिना झाला असला तरी आजही रात्री झोप लागत नाही. अजूनही या गोष्टीचा खूप त्रास होतो, कारण एवढी मोठी संधी असताना देखील ती संधी हातातून निसटली आहे. पण आत्ता खूप जास्त मेहनत घेऊन ऑलिंपिकमध्ये भरतासाठी मेडल्स मिळवायची आहेत, आत्ता हेच स्वप्न असल्याचं मयंकनं सांगितलं. मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे विठ्ठल शिरगांवकर यांनी खूप मदत केली आहे. त्यांनी खूप सपोर्ट केलं आहे. त्यांच्या आजवरच्या या प्रयत्नाने आम्हाला खूप मदत झाली आहे असंही तो म्हणाला.
हेही वाचा :