पुणे - स्ट्राॅबेरी म्हणलं की, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणांची नावे हमखास घेतली जातात. मात्र, आता हे समीकरण बदलत असून भातासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळातील शेतकऱ्यांना लालचुटूक दर्जेदार स्ट्राॅबेरीने भुरळ घातली आहे.
हेही वाचा - सांगली - मिरजेत उभं राहतयं 'मियावाकी देशी वनराई' प्रकल्प
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा भात शेतीसाठी ओळखला जातो. परंतु, शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करण्यासाठी तयार झालेली तरुण शेतकरी पिढी काळाच्या गरजेनुसार स्ट्राॅबेरीचा प्रयोग करीत आहे. धामणे मावळ येथील तरुण शेतकरी योगेश मारुती गराडे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये विट्राॅडाॅन जातीच्या स्ट्राॅबेरीची यशस्वी शेती केली आहे. यामध्ये त्यांना त्यांचे वडील मारुती विठोबा गराडे व भाऊ गणेश गराडे तसेच कुटुंबाची मोलाची साथ मिळाली.
पहिल्यांदा आपल्या दोन एकर क्षेत्रात ठिबक व पाॅलीथीन पेपर टाकून ऑगस्ट महिन्यात वाई येथून 35 हजार स्ट्राॅबेरीची रोपे आणून लागवड केली. रोपांना सावली मिळावी म्हणून योगेशने मक्याची लागवड केली. त्यांना स्ट्रॉबेरीच्या रोपासाठी 3 लाख रुपये व ठिबक व पाॅलीथीन पेपरसाठी दीड लाख रुपये खर्च आला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात स्ट्राॅबेरीची तोडणी सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यामार्फत जानेवारी महिन्यापर्यंत दिल्ली व आता मुंबई व बंगलोर येथे स्ट्रॉबेरी विक्रीसाठी पाठवली जात असून त्यांना स्ट्रॉबेरी पिकापासून खर्च वजा जाता चार ते पाच लाख रुपये मिळाले असल्याचे योगेश या तरुण शेतकऱ्याने सांगितले.
योगेश केलेल्या यशस्वी स्ट्राॅबेरी लागवडीचा प्रयोग पाहण्यासाठी धामणे गावातील तसेच परिसरातील शेतकरी त्यांच्या स्ट्राॅबेरी शेतीला आवर्जुन भेट देत आहेत.
हेही वाचा - तान्हाजी चित्रपट पाहून सहा वर्षाच्या चिमुरडीने सर केला 'तान्हाजी कडा'