पुणे - गाडी, घोडे, मोटारगाड्या, फुले, फळे, भाज्या असे वैविध्यपूर्ण छाप असलेल्या आणि त्यातून स्वतःचे वेगळपण सिद्ध करणाऱ्या इवल्याशा काडेपेट्यांचा भला मोठा दुर्मिळ खजिना आज पुणेकरांसाठी खुला झाला आहे. बालगंधर्व कलादालनात संग्राहक विनायक जोशी यांच्या काडीपेट्या आणि बॉटल ओपनरचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शनिवार (दिनांक 18 जानेवारी 2020) या कालावधीत बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांची 'एजीआर'वरील पुनर्विचार याचिका फेटाळली
दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायामुळे विनायक जोशी यांना अनेक ठिकाणी फिरस्ती करावी लागत असे. त्यावेळी प्रत्येक गावात अनेक प्रकारच्या काडीपेट्या दिसायच्या. त्यावरील रंगसंगती आणि त्यातील विविधता यामुळे आकर्षित होऊन त्यांनी काडीपेट्यांचा संग्रह करायला सुरवात केली. काही काळानंतर प्रत्येक दुकानात जाऊन नवीन प्रकारची काडीपेटी शोधून विकत घेतल्याने त्यांचा संग्रह वाढत गेला. त्यांनी केवळ काडीपेट्या जमवल्या नाहीत, तर त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला. हळूहळू इतर संग्रहकांशी ओळख झाली आणि आदानप्रदान होऊन त्यांच्या संग्रहात भर पडली.
प्रवासाचा छंद असल्याने त्यांनी परदेशातील काडीपेट्या देखील जमवल्या आहेत. आज जोशी यांच्याकडे जगभरातील विविध आकाराच्या आणि वैशिष्ट्य पूर्ण अशा 50 हजारांहून जास्त काडेपेट्यांचा संग्रह आहे. त्यातील दुर्मिळातील दुर्मिळ अशा सुमारे 30 हजार काडीपेट्या या प्रदर्शनात पुणेकरांना पाहता येणार आहेत. यामध्ये जगातील सर्वात छोटी म्हणजे एक सेंटीमीटरची आणि जगातील सर्वात मोठी म्हणजे एक फूट लांबीची काडेपेटी देखील आहे. तसेच आयटीसी अर्थात इंडियन टोबॅको कंपनीने काढलेल्या 'आय नो' या मालिकेतील दुर्मिळ संग्रहाचा देखील यात समावेश आहे. तसेच रामायण, महाभारत, अष्टविनायक, अजिंठा, वेरूळ यांच्यावर आधारित चित्र मालिकांच्या काडेपेट्या या प्रदर्शनात आहेत.
काडीपेट्यांबरोबर विनायक जोशी यांनी संग्रह केलेले बॉटल ओपनर देखील या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. आज त्यांच्या संग्रहात 1200 पेक्षा जास्त ओपनर असून त्यात स्टील, पितळ, प्लास्टिक, लोखंड, अॅल्युममिनीयम अशा विविध धातुंचे जगभरातील दुर्मिळ आणि जुने ओपनरही आहेत.
नवीन पिढीमध्ये दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आपल्या छंदाला संग्रहाचे रूप देत विनायक जोशी यांनी जमविलेल्या विविध चित्रांच्या काडेपेट्या आणि वैविध्यपूर्ण आकाराच्या बॉटल ओपनरचे हे प्रदर्शन शनिवार दिनांक 18 जानेवारी 2020 या कालावधीत बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
हेही वाचा - कृषिक २०२० महोत्सव : 'त्या' सत्कारावर शरद पवारांची मिश्किल टिप्पणी