पुणे - पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग, सफाई कामगारांना मदतीचा हात दिला आहे. गरजुवंत 225 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे त्यांनी वाटप केले आहे. याबरोबरच भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठीही एक लाख रुपयांची देणगी धनादेशाच्या स्वरुपात दिली आहे.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे श्रीक्षेत्र भंडारा डोंगर, श्रीक्षेत्र सावरगाव अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्य करण्यात आले. तसेच लावलेल्या झाडांना पाणी देण्याची सोयही करत एक नवीन योगदान दिले आहे. 3 ते 4 फूट उंचीच्या 500 रोपांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या मंदिरासाठी मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश अरुण पवार यांनी मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील, ट्रस्टचे सचिव जोपासेठ पवार, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ नाटक पाटील, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, वामन भारगंडे, ह.भ.प. मामा ढमाले, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, विजय वडमारे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - 74 वा स्वातंत्र्यदिन : कोरोना विषाणूमुक्तीचा लढा त्याग आणि लढवय्यांप्रमाणे जिंकणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सांगाती फाउंडेशनने सुरू केलेल्या कामगार आणि कारखानदार यांची सांगड या उपक्रमाअंतर्गत बांधकाम क्षेत्रातील सुतार, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, हेल्परसह अनेक क्षेत्रातील कामगारांना कोविड कवच देण्यात आले आहे. यामध्ये अरुण पवार यांनी दहा कामगारांच्या कोविड कवच विम्याचा पहिला हप्ता भरला. आज या भयानक परिस्थितीत अनेकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात देत आपला वाढदिवस साजरा केल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.