पुणे - खेड तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. मात्र, काही जाचक अटी व शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत. असे असतानाही ही योजना कार्यान्वित झाली असे दाखवून १० शेतकऱ्यांचा प्राथमिक सन्मान आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य शरद बुटे पाटील यांनी केला.
खेड तालुक्यातील योजनेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश गोरे, बाबाजी काळे, उपसभापती भगवान पोखरकर, तहसीलदार सुचित्रा आमले, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक व शेतकरी उपस्थित होते.
बुटे पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपये दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने महसुली सातबारा, आधार कार्ड, बँक माहिती अशा स्वरूपात फॉर्म भरून महसूल विभागामार्फत राज्य व केंद्र सरकारच्या वेबसाईटवर अपलोड करायचे होते. मात्र, ही योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय कर्मचारी कमी पडले असून अनेक जाचक अटी व शेतकऱ्यांची थकबाकी या माध्यमातून वसूल करण्याचा प्रयत्न शासकीय कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत.
खेड तालुक्यांमध्ये ७० हजार खातेदार असताना आजपर्यंत २७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित खातेदारांना या योजनेचा लाभ मिळावा. यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला मुदतवाढ मिळण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.