मंचर(पुणे)- पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. बाजार समिती सुरु ठेवल्यास शेतकरी व व्यापारी, आडतदारांचा संपर्क येत आहे. या संपर्कातून कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर ८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
मंचर बाजार समितीत पुणे, मुंबई येथून व्यापारी येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजार समिती बंदचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्याने मंचर बाजारसमिती परिसरात शुकशुकाट पहायला मिळत आहे.
बाजार समिती बंद असल्याने शेतात पिकवलेला शेतमाल कुठे विक्री करायचा, असा गंभीर प्रश्न शेतक-यांसमोर उभा रहाणार आहे.
बाजार समिती आवारात शेतकरी मोठ्या संख्येत येत असतात. त्यामुळे बाजारसमिती आवारात मास्क वापरणे,परिसर सॅनिटाइज करुन निर्जंतुकीकरण केले जात होते. मात्र, मंचर बाजार समितीत पुणे,मुंबई परिसरात व्यापारी शेतमाल खरेदीसाठी येतात. कोरोनाचा समुह संसर्ग होण्याची भीती निर्माण झाल्याने बाजार समितीने बंदचा निर्णय घेतला आहे.