पुणे- पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका व्यक्तीची शस्त्रक्रिया झाली होती. ही व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, रुग्णालयातील ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्त व्यक्ती हा रिक्षा चालक असून ३१ मार्चला कासारवाडी येथे त्याचा अपघात झाला होता. त्याला शहरातील एका खासगी वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु, त्याच्या पोटाला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर रुग्णामध्ये ताप, सर्दी आणि खोकला याची लक्षणे आढळली. त्यानंतर तातडीने रुग्णाचे नमुने तपासणीसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आले. तेव्हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. यानंतर संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ९३ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा- लाॅकडाऊन: सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय तपासणी...