पुणे - आई वडिलांचा निष्काळजीपणा त्यांच्या चार वर्षीय चिमुकलीला भोवला असता, पण एका सुजान नागरिकाच्या समयसूचकतेमुळे मुलीला तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचण्यास सहकार्य मिळाले. कविता भगत सोनार असे या चार वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. आईचे बाळंतपण झाल्याने ती पुण्यातील रुग्णालयात होती. तर, वडीलदेखील तिच्याबरोबर होते. त्यामुळे त्यांनी कविताला शेजाऱ्यांकडे ठेवले होते. यावेळी कविता खेळता-खेळता रस्त्यावर आली आणि घरचा रस्ता विसरली. उस्मान फारीद सय्यद या सजक नागरिकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कविताला सांगवी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर काही तासांनी कविता आपल्या वडिलांच्या कुशीत परत गेली.
सविस्तर माहिती अशी की, कविता ही बुधवारी सायंकाळी खेळता खेळता मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर निघून गेली. रस्त्यावर आल्यावर परत कसे जायचा रस्ता ती विसरली. रस्त्यावरील वाहतुकीच्या भीतीने कविता घाबरुन रडत होती. दरम्यान, रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात ती एका मोटारीच्या समोर आली. मात्र, ऐनवेळी तिला उस्मान सय्यद यांनी बाजूला घेतले यामुळे पुढील अपघात टळला. कविता घाबरली होती, तिला तू कुठे रहातेस? इथे कशी आलीस असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र, तिला एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते त्यामुळे उस्मान यांनी मुख्य रस्त्याच्या परिसरात संबंधित मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. १ तासाच्या प्रयत्नानंतरही मुलीचे आई वडील भेटत नसल्याने उस्मान यांनी कविताला घेऊन सांगवी पोलिस ठाणे गाठले.
हेही वाचा - 'पुणे तिथे काय उणे' : पीएमपी बस थांबवून तरुणीने केला 'टिकटॉक' व्हिडिओ
चार वर्षीय मुलगी असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी तिच्या आई वडिलांचा तत्काळ शोध सुरु करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी कविता मिळाली त्याच परिसरात जाऊन प्रत्येक ठिकाणी चौकशी करून तिच्या घरचा पत्ता शोधला. घरात वडील होते, त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सविस्तर माहिती घेतली असता कविताच्या आईचे पुण्यातील ससून रुग्णालयात बाळंतपण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कविताचे वडील भगत हे देखील तिकडे गेले होते. मात्र, कविताला शेजारी असणाऱ्या व्यक्तीकडे सोडून वडील निघून गेले होते. शेजाऱ्यांनी व्यवस्थित लक्ष न दिल्याने कविता काही तास हरवली होती. मात्र, वेळीच उस्मान धावून आल्याने मोठा अनुचित प्रकार टळला. उस्मान यांचा समयसूचकतेमुळे कविता तिच्या घरी पोहोचली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी उस्मान यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि कौतुकही केले.
हेही वाचा - ...घरात लक्ष्मीचा वास राहावा म्हणून नागरिक पाळतात 'ही' प्रथा