पुणे - माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर असलेली सहकार बचाव शेतकरी पॅनलची सत्ता स्वत:कडे खेचून आणण्यात राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनलला यश आले. वर्षानुवर्ष राष्ट्रवादीची सत्ता असलेला कारखाना मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधकांच्या ताब्यात गेला होता. याची सल पवारांना होती. याचा वचपा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून होते.
पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच सहकारी संस्थावर पवारांचे वर्चस्व कायम आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वर्चस्व होते. मात्र, शरद पवारांचे एकेकाळचे निष्ठावंत असणारे चंद्रराव तावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अपमान झाल्याच्या कारणावरून त्यांनी वेगळी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना सत्ता मिळाली होती. तावरे यांनी कारखान्यावर सत्ता मिळवल्यानंतर शरद पवार यांच्याशी वैचारिक मतभेद असल्याचे मान्य केले होते.
हेही वाचा - अर्थसंकल्पापूर्वीच ठाकरे सरकारने पुरवणी मागण्या केल्या सादर, कर्जमाफीसाठी १५ हजार कोटींची तरतूद
या वेळच्या निवडणुकीत मात्र, सहकार बचाव शेतकरी पॅनलला आपली सत्ता कायम ठेवण्यात अपयश आले. निकालाची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आली नसून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.