बारामती - दुधाला सरसकट १० रुपये आणि दूध पावडरला प्रतिकिलो किलो ५० रुपयांचे अनुदान मिळावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महायुतीच्या मित्र पक्षांनी एकत्र येत बारामतीतील प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर (गेटसमोर) दूध ओतून आंदोलन केले. तसेच, आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले. यानंतर आंदोलकांनी बारामती येथील प्रशासकीय भवनाच्या गेटसमोर दुधाला ३५ रुपये भाव मिळालाच पाहिजे, अशा प्रकारची घोषणाबाजी केली.
हेही वाचा - व्याधीग्रस्त मुलीवर मांत्रिकाचे अघोरी उपचार, चप्पल तोंडात धरून गावभर फिरवले
या आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, रासप तालुकाध्यक्ष अमोल सातकर, रिपाईचे संजय वाघमारे, गोविंद देवकाते, सुधाकर पांढरे, रासपचे जिल्ह्याध्यक्ष संदीप चोपडे, भाजपचे शहराध्यक्ष सतिश फाळके, नगरसेवक सुनिल सस्ते, यासह भाजपा, रासप, रिपाई आणि शिवसंग्राम पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका केली.