पुणे - महाराष्ट्रातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमाशंकर येथे आज महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते मंदिरात शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुले करण्यात आले आहे.
आज पहाटेपासूनच महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. शासकीय पूजा झाल्यानंतर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर शिवलिंग दर्शनासाठी खुले करण्यात आले. भीमाशंकर हे अर्धनारी रूप असल्याने याठिकाणी महिला-पुरुष या दोघांनाही खुले दर्शन दिले जाते.
देशभरातून येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पोलीस महसूल विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, वनविभाग अशा सर्व शासकीय यंत्रणा भीमाशंकर परिसरामध्ये कार्यरत आहेत. भीमाशंकर हा जंगल परिसर असल्याने या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दोन किलोमीटर पाठीमागे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी बसेस मोफत ठेवण्यात आलेल्या आहे. त्यासाठी भाविकांना कुठल्याही प्रकारचा तिकीट दर आकारला जात नाही.