पुणे- महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. अशा वास्तू टिकविणे, इतरांना त्यांचे महत्व पटवून देणे ही आपली जबाबदारी आहे. पुणे शहरातील ऐतिहासिक नानावाड्याचे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुनरुज्जीवन झाले ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. या वास्तुमध्ये १८५७ च्या युद्धाचा इतिहास दडलेला आहे. हा वाडा म्हणजे इतिहासाचे चालते बोलते पुस्तकच आहे. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) नानावाड्यातील संग्रहालयाच्या उद्घाटना प्रसंगी व्यक्त केले आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने ऐतिहासिक नानावाड्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते. या वाड्याच्या तळमजल्यावरील अकरा खोलीत स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, नानावाड्यातील अकरा खोल्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील घडामोडी आणि क्रांतिकारकांचा जीवन प्रवास रेखाटण्यात आला आहे. या माध्यमातून पुढील पिढीला इतिहासाच्या घडामोडीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. ही वास्तू येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाचा काय आहे नानावाड्याचा इतिहास
पेशव्यांचे विश्वासू मंत्री नाना फडणवीस यांनी १७४० ते १७५० दरम्यान शनिवारवाड्याच्या मागील बाजूस नानावाडा बांधला होता. यानंतर दीडशे वर्षांनी या वाड्याचे विस्तारीकरण करण्यात आले. दगड आणि लाकडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या तीन मजली वाड्यामध्ये मागील काही काळात शाळा आणि नंतर महापालिकेचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. परंतु ऐतिहासिक वास्तूंमध्ये ए ग्रेड असलेल्या या वाड्यामध्ये क्रांतीकारकांचे संग्रहालय करण्याबाबत पालिकेने २०१० मध्ये निर्णय घेतला होता. त्यानुसार नानावाड्याच्या दुरूस्तीचे आणि रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले. आजमितीला पुर्वीप्रमाणेच त्याचे रुप पालटले आहे.
या वाड्याच्या तळमजल्यावरील ११ खोल्यांमध्ये पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांनी पुण्याची रोवलेली मुहुर्तमेढ, आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे, १८५७ चे बंड, आदिवासींचा उठाव, बाळ गंगाधर टिळक, चाफेकर बंधू यांच्या जीवन चरित्रावर आधारीत ध्वनी आणि चित्रफितींचा संग्रह ठेवण्यात आला आहे. या संग्रहालयाद्वारे नव्या पिढीला स्वातंत्र्यलढा आणि क्रांतीकारकांची माहिती होणार आहे. हे संग्रहालय लोकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्रबिंदू ठरणार आहे.