बारामती : राज्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, अशी स्थिती आम्हाला बनवायची आहे. मी आता आमदार असलो तरी, २०२४ च्या निवडणुकीत मी बारामती, माढा किंवा परभणी यापैकी एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. जानकर आज बारामतीत आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की सध्या मी भाजपा सोबतच आहे. मात्र, भविष्यात जर काही गोष्टी वेगळ्या घडल्या तर सगळेच पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. भाजपाला देखील मी माझे उपद्रवमूल्य दाखवून देणार असल्याचा इशारा जानकर यांनी यावेळी दिला. महाविकास आघाडीकडे जवळीक वाढत असल्याच्या प्रश्नावर जानकर म्हणाले की, मी एका पक्षाचा प्रमुख असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस सर्वच पक्षांच्या प्रमुखांसोबत माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे सध्यातरी माझा महाविकासआघाडीकडे कल नाही.
सरकारवर मला टीका करायची नाही..
धनगर समाजबांधवांना आदिवासी बांधवांसाठी असलेल्या २२ योजनांच्या सवलती मिळाव्यात यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना अध्यादेश काढला. एक हजार कोटींची तरतूदही केली होती. मात्र त्याच वेळेस आचारसंहिता लागली व सरकार गेले. दुर्दैवाने महाविकासआघाडीच्या सरकारने ही तरतूद केलेली नव्हती. मात्र मी सभागृहात मुद्दा मांडला नंतर अजित पवार यांनी शंभर कोटींची तरतूद यासाठी केली. या सवलती मिळण्यासाठी राजकीय दबाव तयार करावा लागेल असे जानकर म्हणाले. विद्यमान सरकारवर मला टिका करायची नाही पण त्यांनी तरतूद करायला हवी अशी अपेक्षा यावेळी जानकर यांनी व्यक्त केली.
बारामतीवर विशेष लक्ष..
दरम्यान, जानकर यांनी तीन पैकी एका मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांचे सगळे लक्ष बारामतीवर केंद्रित आहे. या मतदारसंघात गेली तीन दिवस ती तळ ठोकून आहेत. महाराष्ट्र फिरून मी बारामतीत मुक्कामी येत आहे. येथे सर्व लोकांनी मला भरभरून प्रेम केले. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणत बारामतीत लक्ष घालून लोकांचे प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही जानकर यांनी दिली.
हेही वाचा : महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बैठीकीचा सपाटा; वाझे प्रकरणावर चर्चा?